नाशिक, (सद्वार्ता). महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेतील अत्यंत महत्त्वाच्या आषाढी एकादशी निमित्त त्र्यंबकराज पॅरालिसिस सेंटरच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांसाठी कार्यरत आधारतीर्थ आश्रमास भेट देऊन फराळाचे वाटप करण्यात आले.
या समाजोपयोगी उपक्रमात डॉ. आशिष ठाकरे, डॉ. संदेश काठे, अक्षय चंदाने, ऋषिकेश थोरात, ऋषिकेश लोखंडे, कार्तिक नेरकर, अभिजीत गवळी तसेच संपूर्ण टीमने उत्साहाने सहभाग घेतला.
यावेळी आश्रमातील विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. फराळाचे वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचा प्रयत्न करण्यात आला. सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवत गरजू मुलांच्या पाठीशी उभे राहणे हीच खरी मानवसेवा असल्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
याप्रसंगी टीमने “आम्ही आरोग्याचे वारकरी, माणुसकी हीच आमची पंढरी” हा संदेश देत आरोग्यसेवा आणि समाजसेवा यांचा सुंदर संगम घडवून आणला. उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक करत अशा सामाजिक उपक्रमांची सातत्याने अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.