बुलढाणा
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत राज्य शासनाने २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी जाहीर केली आहे. हा निर्णय स्वागतार्ह असला तरी यापूर्वी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ चा लाभ घेतलेल्या लाखो शेतकऱ्यांना केवळ ५० हजार रुपयांपर्यंत मर्यादित लाभ देण्यात येत असल्याने त्यांच्यावर अन्याय होत आहे. त्यामुळे सरकारने विनाअट सरसकट कर्ज माफी करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष संगीतराव भोंगळ यांनी निवेदनाद्वारे बुलढाणा जिल्हाधिकारी यांचेमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे केली आहे.
जिल्हाधिकारी यांना सादर केलेल्या निवेदनात नमूद आहे की,
२०१९ नंतर पुन्हा शेतीसाठी कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना मागील काही वर्षांत सततची नापिकी, अतिवृष्टी, दुष्काळ, गारपीट, नैसर्गिक आपत्ती तसेच शेतमालाला न मिळालेला हमीभाव यामुळे मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागला आहे. अनेक शेतकरी प्रामाणिकपणे शेती करत असताना त्यांच्या डोक्यावर पुन्हा कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे. आज अनेक शेतकऱ्यांची थकबाकी १ ते २ लाख रुपयांपर्यंत पोहोचली असून ती भरण्याची त्यांची आर्थिक क्षमता राहिलेली नाही. सध्याच्या शासन निर्णयानुसार अशा शेतकऱ्यांना फक्त ५० हजार रुपयांची कर्जमाफी मिळणार आहे. म्हणजे दोन लाख रुपये थकबाकी असलेल्या शेतकऱ्याने आधी दीड लाख रुपये भरायचे आणि त्यानंतर केवळ ५० हजार रुपयांचा लाभ घ्यायचा. ही अट व्यवहार्य नसून त्यामुळे लाखो शेतकरी प्रत्यक्ष कर्जमाफीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
शासनाने या विषयाची गांभीर्याने दखल घेऊन महात्मा फुले कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांनाही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत २ लाख रुपयांपर्यंत विना अट संपूर्ण कर्जमाफीचा लाभ द्यावा, अशी ठाम मागणी करण्यात आली. आहे या निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष संगीतराव भोंगळ पाटील, जी.प. मा. सभापती लक्ष्मीताई शेळके, जोतीताई खेडेकर, वर्षाताई इंगळे, पी एम जाधव, अनिल वर्मा, सुनील सोनूने, रिजवान भाई,दीपक म्हस्के, राजेश गवई, भगवान शेळके, विष्णू पवार, शिवाजी पडोळ,मधुकर पाटील, पिंपरकर साहेब, प्रभाकर काळवघे, पंजाबराव राऊत, वायाळ सर, आशाताई पवार, ओम लेंडे, संजय शिरसाठ, विशाल पाटील, शेषराव पाटील, शिवराज शेळके, स्वराज शेळके, ज्ञनेश्वर यांचेसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते





